करमणुकीच्या साधनांवर बंदी आणली तर...
(कल्पनाप्रधान निबंध किंवा कल्पनाविलासात्मक निबंध)
मुद्दे : करमणुकीची विविध साधने - पिकनिक - दूरचित्रवाणी - चित्रपट - बंदी घातली गेली तर चोर मार्ग शोधले जातात - गुन्हेगारी वाढते - विविध शर्यती - करमणूक कर - बेकारी वाढेल - कलाविष्कारावर बंदी - उरतील फक्त कष्ट - बंदीचा अतिरेक त्रासदायक - हिंसक वृत्ती वाढेल - विवेक हवा.
महाविद्यालयीन युवकांचा एक समूह रस्त्याच्या एका कोपऱ्यात उभा राहून गप्पांत गुंतला होता. सहज कुतुहलाने कान टवकारून कानोसा घेतला तेव्हा कळले की, पिकनिकला जाण्याचे बेत रचले जात होते. 'पिकनिक' म्हणजे बेबंद वागणे, मौज मजा, हल्ला-गुल्ला. त्यामुळे करमणुकीच्या साधनांची रेलचेल भरपूर. दूरचित्रवाणीच्या आगमनापासून करमणुकीचे ते एकमेव प्रभावी साधन ठरले आहे. दूरदर्शन आले तेव्हा त्याचा परिणाम चित्रपटांवर होणार, असा गाजावाजा केला जात असे. पण आज प्रत्यक्षात काय आढळते? चित्रपटगृहासमोर लागलेल्या रांगा कुठेही कमी नाहीत.
करमणुकीच्या साधनांवर बंदी आली तर....! ज्या गोष्टीवर बंदी घातली जाते त्या गोष्टी चोरून करण्याची प्रवृत्ती वाढते आणि मग त्यातून गुन्हेगारी वाढत जाते. करमणुकीची साधने - विशेषतः घोड्यांच्या शर्यती, कॅसिनो, चित्रपट यातून सरकारला करांचे भरपूर उत्पन्न मिळत असते. करमणुकीच्या या साधनांवर बंदी आली तर हे सरकारी उत्पन्न बुडेल. त्यामुळे सरकार अशी बंदी कृतीत आणत नाही.
आज असलेल्या या करमणुकीच्या साधनांच्या निर्मितीत, त्यांच्या आयोजनात लाखो मंडळी गुंतलेली आहे. उद्या करमणुकीच्या साधनावर बंदी आली तर... हे लाखो लोक बेकार होतील. बेकारीच्या समस्येची भीषणता अधिकच उग्र स्वरूप धारण करेल.
करमणुकीच्या साधनांत मनोरंजन करणारे ललित साहित्य ही येईल. चित्रकार, शिल्पकार आदी कलावंतांच्या प्रदर्शनाचाही सामावेश होईल. गायकांच्या मैफिली आणि तमासगीर यांच्या बाऱ्याही येतील. भारताच्या विविध भागात विविध लोककलांचा आविष्कार होत असतो. या कलांच्या अनुषंगाने हजारो कलाकार आपली कला विकसित करत असतात. 'करमणुकीच्या साधनांवर बंदी' या नियमाने या कलाविष्कारावर बंदी आली, तर ते या सर्व कलाकारांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरेल.
करमणुकीच्या साधनांवर बंदी असलेल्या या राज्यातील सामान्य माणसासाठी उरतील केवळ कष्ट आणि कष्ट! त्याचा परिणाम म्हणजे तो कंटाळेल, उबेल आणि आळसावेल. बंदीचा अतिरेक झाला तर तो वेडा होईल किंवा हिंसक बनेल. हा मोठा धोका आहे.
करमणूक ही हवी, पण करमणुकीच्या साधनांचा वापर विवेकाने केल्यास संभाव्य धोके टळतील आणि मग 'करमणुकीच्या साधनांवर बंदी आणली तर...' हा विषयच बाद होईल.