शेतकऱ्याचे आत्मवृत्त
'मातीत काळ्या जन्मला
काळ्या मातीशीच नात
गाळून घाम कष्टाचा
भरतो पोटं तुमचं आमचं'
कवी पद्माकर म्हात्रे यांच्या कवितेच्या या ओळी मी आणि माझ्यासारख्या हजारो शेतकरी बांधवांचे अवघे आयुष्य सामावणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला मी एक शेतकरी. मराठवाडयाच्या दुष्काळी भागात माझ्या जमिनीचा लहानसा तुकडा आहे. लहानशीच असली तरी माझी जमीन मात्र सुपीक आहे. सोनं उगवतं माझ्या जमिनीत! पण पावसाची कृपादृष्टी असेल तरच...! काही वर्षांपूर्वी आमच्याकडे दुष्काळ पडला होता. मराठवाड्याला दुष्काळ तसा दीर्घ परिचयाचाच, पण या दुष्काळाने आभाळातलं पाणी काढून जणू ते शेतकऱ्याच्या डोळ्यांत भरलं होतं. माझे सारे बांधव आभाळाकडे डोळे लावून बसले होते, पण पावसानं काही हजेरी लावली नाही. काळ्या ढगाच्या रूपातला माझा सावळा विठू कधी दर्शन देतो याची सारेच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, पण विठूराया जणू आपल्या सग्या मुलांवर रुसला होता. संपूर्ण जमिनीलाही तडा गेल्या होत्या. जणू तिही तोंड उघडून या पावसाची आस लावून बसली होती. पावसाचा धारेची आतुरतेने वाट पाहत होती. शेतीलाच काय, पण प्यायलाही पाणी उरलं नव्हतं. कोसांवरून बाया-बापडे पाणी घेऊन येत होते, पण पावसाला मात्र काही दया आली नाही. उन्हानं आणि भुकेनं बेजार झालेल्या पोरांकडं पाहिलं की काळीज तुटत होतं. 'काय करायचं जगून?' असा प्रश्न सारखा मनात येत होता. अनेकांनी आत्महत्या करत आपल्या दुःखातून मुक्ती मिळवली. मी.... मी मात्र खमका राहिलो. मला कधीही हरायचं नव्हतं. या परिस्थितीवर मला मात करायची होती. मी उभारलो. आकाशवाणी, दूरदर्शनवर येणारी शेतीविषयक सत्रं, मुलाखती ऐकल्या, कृषिखात्याची शिबीरं पालथी घातली. शेतीची नवी तंत्र शिकून घेतली. आलटून-पालटून पीक घेण्याची पद्धत मी अवलंबली. मशागतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेचा फायदा घेऊन मी ट्रॅक्टर घेतला. 'पाणी आडवा, पाणी जिरवा' या योजनेचा अवलंब करत शेतातच पाणी अडवले. त्यामुळे, पावसावर अवलंबून राहण्याची गरज मला उरली नाही.
शेती तर छान फुलू लागली. आता त्याला जोडधंदा म्हणून मी फुलांचा मळाही फुलवला. त्यातून घरखर्चासाठी पुरेसा पैसा मिळू लागला. उत्तम बी-बियाणे, खते वापरून मी उत्तम पीक घेऊ लागलो. अनेक बंधुंनी माझे अनुकरण केले. त्यामुळे, या दुष्काळावर मात करण्यात आम्ही यशस्वी झालो.
शिक्षणाच्या अभावामुळे मी या तंत्रापासून दूर राहिलो. सावकराने तर माझ्या अशिक्षितपणाचा चांगलाच फायदा उचलला होता. त्यामुळे, तर शेतीचा माल विकून येणारा सारा पैसा सावकराकडे जायचा. बाजारात माल घेऊन जायचो तेव्हा परतीच्या वेळेला पोरं दारात आस लावून उभी असायची. त्यांना तोंड देताना मनात कालवाकालव व्हायची. मग मी ठरवलं, की मी जे भोगलं ते माझी मुलं भोगणार नाहीत. मी त्यांना शिकवलं. त्यांच्याच हट्टापायी मी शेतीचं नवं तंत्र शिकून घेतलं आणि आज मी माझ्या कुटुंबाला पोटभर खाऊ घातल असल्याचं समाधान मिळवलं. माझ्या मुलांनीही मातीची जाण राखली. कृषिक्षेत्रात उच्चशिक्षण घेत त्यांनी परदेशापर्यंत मजल मारली. परदेशात जाऊन शेतीची नवी तंत्र, आधुनिक उपकरणे सोबत आणून अख्ख्या गावाची शेताची समस्या सोडवली.
मी माझी नजर बदलली आणि हे सगळं शक्य झालं. सरकारच्या विविध योजना मी समजून घेतल्या. त्याचा माझ्या बांधवांना परिचय करून दिला. आज माझं संपूर्ण गाव शेतीला अग्रेसर आहे. शहरांत अनेक ठिकाणी आमचा माल जातोच, पण परदेशातही आमचा माल निर्यात केला जातो.
मित्रांनो, आपल्यावर संकटे येतात म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेत यश मिळवायचं तर या संकटांना मागे सारावं लागतं. लढा द्यावा लागतो. याप्रसंगी आपण पडतो, खचतो, मोडतो पण आपण थांबायचं नाही. संकटांतून मार्ग शोधून काढत यश मिळवायचे असते. परिस्थितीपासून कधीही पळायचे नसते हे मी माझ्या अनुभवातून शिकलो.
आज मी एक शेतकरी आहे याचा मला नितांत अभिमान आहे. आज माझ्यामुळे कित्येकांच्या चुली पेटतात यासारखा दुसरा आनंद नाही. हे विश्व माझे कुटुंब आहे व त्यांना पोसण्यासाठी मी आजही खंबीर आहे. याचा मला अभिमान आहे.