माणुसकीचा झरा - बाबा आमटे
माणूसपण हरवत चाललेल्या या काळात माणूस म्हणून माणसाची निस्वार्थीपणे सेवा करणारा, माणुसकीचा अखंड खळाळत वाहणारा झरा म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे, उर्फ बाबा आमटे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना दहा जन्मांतही करता येणार नाही एवढे मोठे महान कार्य त्यांनी केले आहे. समाजाने नाकारलेल्या, शारीरिक आणि मानासिक वेदनेने तळमळणाऱ्या, समाज्याच्या द्वेषाला नेहमी सामोरे जाणाऱ्या कुष्ठरोग्यांना आश्रय देऊन, त्यांच्यावर उपचार करून, त्यांच्यातील नाहीसा झालेला आत्मविश्वास जागवण्याचे कार्य केले ते बाबा आमटेंनी.
बाबा आमटे एका सुखवस्तू कुटुंबात वाढले. परंपरागत श्रीमंती लाभलेल्या बाबा आमटेंना मात्र सामाजिक ओढच अधिक होती. त्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची आस होती. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभावही होता. माणसा माणसातील अस्पृश्यता, असमानता, उचनिचता, जातिवाद न मानणारे बाबा लहानपणापासून खालच्या जातीतील मुलांमध्ये मिसळत. त्यांच्यांमध्येच रमत असत. त्यांना घरातून रोखूनही त्यांनी माणसा - माणसांमध्ये कधी भेद केला नाही.
वकिलीचे शिक्षण घेऊन वकिली सुरू केलेल्या बाबांचे मन मात्र वकिलीमध्ये कधी गुंतले नाही. लग्नानंतरही आयुष्याची दिशा शोधण्यासाठी ते सतत धडपडत होते. त्यांच्या आयुष्याला वळण मिळाले ते एका जगावेगळ्या अनुभवाने. एके दिवशी रस्त्यावर त्यांना एक कुष्ठरोगी भयाण अवस्थेत पडलेला दिसला. त्या रोग्याला पाहून त्यांचे मन सुन्न झाल. हातपाय सडलेला, घाण वाहणारा तो कुष्ठरोगी पावसात भिजत पडला होता. त्याला पाहून बाबा क्षणभर घाबरले व तेथून पळाले. मात्र काही वेळातच ते परत आले आणि त्या माणसाला त्यांनी माणुसकीचा हात दिला. शेवटपर्यंत त्याची सेवा केली. त्याच्या मृत्यूनंतर जणू बाबांना त्यांचा मार्ग गवसला. त्या कुष्ठरोग्यासाठी सरसावलेला तो हात पुढे अनेकांना तारणारा ठरला. त्यानंतर मात्र बाबांनी स्वतःचा मार्ग निवडला. त्याकाळात कुष्ठरोगाने भारतात थैमान घातले होते. अनेक लोक या आजाराने ग्रस्त होते. या लोकांचे कौटुंबिक, सामाजिक जीवन उद्ध्वस्त झाले होते. अशा लोकांना घरापासून दूर रस्त्यावर जगावे लागत होते. आपल्यांनीच नाकारल्याने, स्वतःच्या नातेवाईकांनी झिडकारल्याने, मनाने खचलेल्या, आत्मविश्वास नाहीसा झालेल्या या कुष्ठरोग्यांना मायेची पाखर दिली ती बाबा आमटेंनी.
बाबा आमटेंनी अशा निराधार लोकांची सेवा करण्याचा वसा घेतला आणि तो त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळला. त्यांनी कुष्ठरोगावर आळा बसवण्यासाठी लोकांना जागरूक केले. या रोगाविषयी समाजामध्ये प्रबोधन केले. समाजातील विविध भागामध्ये स्वतः भेटी देऊन अशा माणसांचा शोध घेतला. अशा लोकांसाठी त्यांनी महाराष्ट्रात आश्रम स्थापून त्यातून कुष्ठरोग्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. त्यांच्यावर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले. त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करून त्यांना रोजगारही मिळवून दिला. त्यांची ही सेवा सर्व धर्मांसाठी आणि प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी खुली होती. त्यांनी त्यांच्या सेवे मध्ये कधीच भेदभाव केली नाही. सर्वांनावर स्वतःच्या लेकराप्रमाणे माया करून सर्वांची सेवा केली.
कुष्ठरोग्यांसाठी उपचार प्रशिक्षणाकरता, त्यांच्या पुनर्वसनाकरता त्यांनी रुग्णालये व अन्य प्रशिक्षण केंद्रे राज्यात ठिकठिकाणी उभारली. घनदाट जंगलात, प्राकृतिक अडथळे दूर करत, अनेक संकटांशी सामना करत त्यांनी अनेक आदिवासींना निस्वार्थीपणाने सेवा पुरवली. शासनाचा रोष, असहकार सहन करत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
१९७३ साली गडचिरोली येथील एका आदिवासी भागात माडिया गोंड जमातीच्या आदिवासी समूहांना संघटित करून त्यांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. येथील लोकांना अंधश्रद्धा, वेगवेगळे रोग, यांतून बाहेर काढत, ते करत असलेली प्राण्यांची कत्तल, तस्करी अशा गुन्ह्यांनाही त्यांनी आळा घातला.
'मी एक महान नेता बनण्यासाठी काम करत नाही, तर मी गरजू, गोरगरिबांची मदत करू इच्छितो' असे नम्रपणे सांगणाऱ्या बाबांनी आपल्या साऱ्या सुखांचा त्याग करत स्वतःला समाजसेवेत वाहून घेतले.
पद्मश्री, रमन मॅगसेस, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण अशा एक ना अनेक पुरस्कारांनी बाबा आमटेंच्या कार्याला गौरवण्यात आले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी या कार्यात कधीही खंड पडू दिला नाही. २००८ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या कार्याची ज्योत त्यांच्या कुटुंबाने आणि सहकाऱ्यांनी आजवर तेवत ठेवली आहे. हेमलकसा प्रकल्प, आनंदवन, सोमनाथ, अशोकवन ही सारी बाबा आमटेंच्या कार्याची परिणीती आहे.
बाबा आमटेंपासून सुरू झालेला हा माणुसकीचा झरा आजही अखंडपणे वाहत आहे. अनेक प्रवाहांनी तो अधिकाधिक समृद्ध होत आहे.