निसर्ग कोपला तर... किंवा निसर्ग कोपतो तेव्हा...
(कल्पनाप्रधान किंवा कल्पनाविलासात्मक निबंध)
मुद्दे : निसर्ग व माणूस यांच्यात योग्य संतुलन - माणसाचा सखा - पण केव्हातरी चिडतो - समुद्रात वादळे - भूकंप - दुष्काळ - अवर्षण आणि अतिवर्षण - टोळधाड - कारण काय? माणसांचे वागणे - अतोनात वृक्षतोड - समुद्राकाठची आवश्यक वनस्पती काढणे.
निसर्ग आणि मानव ही ईश्वराची निर्मिती. निर्मात्याने त्यांची निर्मिती केली ती परस्पर संतुलनाने! निसर्गाचा कण न् कण हा माणसाच्या सुखासाठी असतो. माणसाचा सखा केव्हातरी क्षुब्ध होतो. तेव्हा प्रश्न उभा राहतो की, निसर्ग माणसाचा मित्र की शत्रू? अलीकडे एकापाठोपाठ आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हा प्रश्न प्रकर्षाने आपल्या समोर उभा ठाकला आहे.
नेहमी प्रशांत असणाऱ्या सागरात अचानक चक्रीवादळ उत्पन्न होते. वादळाचा प्रचंड वेग माणसाला घाबरवून सोडतो. माणूस या वादळाला थोपवू शकत नाही. हे वादळ कुठे जाणार? त्याचा वेग काय? आणि त्याच्यामुळे किती नुकसान होणार? याचाच फक्त अंदाज बांधत राहावे लागते. खवळलेला वारा नेहमी त्याच्या सहवासात राहणाऱ्या माणसांना शूद्र कस्पटा प्रमाणे उडवून लावतो. समुद्र आणि मच्छीमार यांचे नाते किती जवळचे! युगानुयुगांचा त्यांचा सहवास, पण उन्मत्त झालेल्या तुफान या कोळ्यांच्या बोटी उलट्या करते. या वादळा बरोबर कोसळणारा पाऊस असतो आणि कडाडणार्या विजा असतात. एखाद्या दिवसाचा वा काही तासांचा हा प्रक्षोभ होत्याचे नव्हते करतो.
तेव्हा निसर्गाचा प्रकोप होतो आणि भूकंप होतो. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील किल्लारी ला आणि अलीकडे गुजरात मधील भुजला भूकंपाने होत्याचे नव्हते केले. राष्ट्रगीत गाणारी मुले काही सेकंदातच भूमातेच्या पोटात गडप झाली. उंच इमारतीचे दोन तीन मजले खचले. काही क्षणांच्या भूकंपात कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आणि हजारो माणसे नष्ट झाली. निसर्गाच्या या प्रकल्पाची माणसाला थोडीही पूर्वकल्पना येऊ शकत नाही. आज शेकडो वर्ष माणूस त्यासाठी धडपडत आहे, पण निसर्गाच्या या रौद्र संतापाचे कारण माणसाला उभारलेले नाही.
निसर्ग रुसला तर कधी वर्षामागून वर्षे आपले पावसाचे भांडार खोलातच नाही. मग अवर्षणाचे संकट ओढवते, तर कधी नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी कोसळत राहतो. मंग ओला दुष्काळ पडतो. पिकलेले धान्य, झाडाला आलेली फळे नाश पावतात. कधी जीवनदात्री नदी चिडते आणि महापुरात सारे वाहून जाते, तर कधी कोठे कल्पनेच्या पलीकडे टोळधाड येते. ती जणू सूर्यालाही झाकून टाकते. अंधारून येते आणि काही मिनिटांतच तयार झालेले धान्य फस्त करते. कधी मोहरलेल्या झाडांवर रोग येतो, तर कधी तयार फळांवर कीड पडते.
अशा नाना प्रकारे माणसाला निसर्गाचा प्रकोप पत्करावा लागतो आणि मग त्याच्या मनात येते की निसर्ग माणसाचा मित्र आहे का? पण यावेळी माणूस स्वतःची कुकर्मे विसरलेला असतो. तो आपल्या अविरत वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडवून टाकतो. सिमेंटची जंगले उभी करतो. यामुळे पावसाचे प्रमाण मंदावते. समुद्राकाठची वनस्पती काढल्याने किनार्याची धूप होते. एक ना अनेक कारणे - माणसाचा या नको त्या उलाढालीमुळे निसर्गाचा प्रकोप होतो हेच खरे !