दिक्षाभूमीच्या निर्माणाचा इतिहास!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा असून तो स्तूप देशातील सर्व बौद्धांचे उर्जास्थान बनले आहे.
धर्मांतर सोहळ्याला ६५ वर्षाचा काळ लोटला तरी दिवसेंदिवस दीक्षाभूमीचे महत्व वाढताना दिसतेय. त्यामुळे नव्या पिढीला ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास माहिती असणे आवश्यक वाटते.
दीक्षाभूमी जागेचा इतिहास :
धम्मदीक्षेपूर्वी ही जागा वैक्सिन इन्स्टिट्यूटने गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवली होती. या जागेचे क्षेत्रफळ १४ एकर असून पडीत असलेली ही जागा त्यावेळी खाचखळगे, दगडधोंडे, लहान – मोठी झाडेझुडपे व गवतांचे रान होती. ही जागा दीक्षा समारंभासाठी मिळविण्यासाठी २८ सप्टेंबर १९५६ रोजी रीतसर अर्ज करण्यात आला आणि २८ सप्टेंबर १९५६ रोजी इन्स्टिट्यूटने ‘ना हरकत पत्र’ दिले. त्यात ही अट होती की २८ सप्टेंबर १९५६ ते ११ ऑक्टोबर १९५६ पर्यंत या जागेत गुरे चरण्यास येत राहतील व १५ ऑक्टोबर १९५६ नंतर ही जागा गुरांच्या चरण्यासाठीच पुन्हा उपयोगात आणली जाईल.
दीक्षाभूमीवर पहिला बुद्धस्तंभ १३ एप्रिल १९५७ ला एका रात्रीतून बाबू हरिदासजी आवळे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला. बुद्ध स्तंभ हा मेंढे गुरूजी ( भिक्खू धीरधम्म ) यांनी एका रात्रीतून बांधला. स्तंभावरील बुद्धमूर्ती भीमराव गजघाटे रा. पाचपावली, नागपूर यांनी तयार केली. (प्रल्हाद मेंढे गुरूजी, रा. कर्नलबाग, पत्र १२ जून १९९६) सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी बुद्ध स्तंभ उभारण्यास आवळे बाबूस सहकार्य केले होते.
बुद्ध स्तंभास धोका पोहचू नये म्हणून एक रखवालदार आणि स्तंभाशेजारी एक लहानसे पत्र्याचे शेड उभारण्याचे ठरविले होते. त्यासाठी मेंढे गुरूजी यांनी सामानही आणले होते. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशीच सीताबर्डी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सर्व साहित्य बेकायदेशीर समजून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या नझूल तहसीलदाराने ‘लँड रेव्हेन्यू अॅक्ट’ मध्यप्रदेश सेक्शन २२९ च्या आधारे स्मारक समितीच्या बुद्ध महासभेच्या आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या प्रमुख पुढाऱ्यांवर खटला भरला.
स्मारक समितीचे कार्यवाह आर. आर. पाटील यांनी कोर्टात दीक्षाभूमीवरील स्तंभ कुणी बांधला हे माहित नसल्याचे सांगितले. कर्मवीर आवळे बाबूंनी दीक्षाभूमीवरील स्तंभ बांधल्याचे कोर्टात कबूल केले. त्यामुळे आवळे बाबूवर केस चालून शेवटी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्या केसचा नंबर १२४-१-५२ ए ऑफ ५७-५८ होता. यावरून दीक्षाभूमीवरील स्तंभ उभारण्यात वर नमूद केलेल्या व्यक्तींचे बहुमूल्य सहकार्य लाभले होते. केवळ एकट्या व्यक्तीचे ते कार्य नव्हते. ( प्रल्हाद मेंढे गुरूजी, रा. कर्नलबाग, पत्र ८ जून १९९६ ).
दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून दादासाहेबांचे प्रयत्न
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईच्या दादर चौपाटीवर चैत्यभूमीची जमीन व नागपूरची दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दीक्षाभूमीची १० बाय १० फूट जमीन देतो असे उर्मटपणे म्हटले. तेव्हा दादासाहेब गायकवाड यांनी लढा दिला.
मराठी भाषकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १५ ऑगस्ट १९६१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूर या संस्थेला १४ एकर जमीन हस्तांतर केली. या विजयानंतर स्मारक समितीचे कार्यालय दीक्षाभूमी नागपूर येथे उभारण्यात आले. त्याचा शिलान्यास ३० सप्टेंबर १९६१ रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बसविण्यात आला.
१३ जून १९६३ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून दीक्षाभूमी येथील कार्याला प्रारंभ झाला. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे २९ डिसेंबर १९७१ रोजी झाले. त्यांच्यानंतर १९७२ साली आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या अध्यक्षपदी रा.सू.गवई यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमीचे कार्य जोरात सुरु झाले.
स्मारक समितीच्या कार्यात यशवंतराव आंबेडकर, रेवाराम कवाडे (गुरुजी ), अॅड. एन.एच. कुंभारे (समितीचे सदस्य व कार्याध्यक्ष), अॅड.डी.एम.गजभिये, सी.एम.आरमुघम, आर.आर.पाटील, वा.को.गाणार, संपतराव रामटेके आणि डॉ.स.वि.रामटेके यांचे संपूर्ण सहकार्य होते. या सर्वांची आठवण बाबासाहेबांच्या स्मारकाच्या रूपात कायम राहील.
स्मारक उभारणीत नागपूरचे सदानंद फुलझेले यांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माची दीक्षा घेतली व लाखो अनुयायांना दीक्षा दिली त्यावेळी फुलझेले हे नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर होते. उपमहापौर या नात्याने त्यांनी दीक्षा समारंभप्रसंगी व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडली होती.
दीक्षाभूमीवर देशातील सर्वात मोठा स्तूप उभारला
दीक्षाभूमी येथील १४ एकर जागेवर देशातील सर्वात मोठा स्तूप उभारण्यात आला. यावर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. स्तूपाची उंची १२० फूट असून स्तुपाचे शिल्पकार शिवदानमल आहेत. स्तूपाच्या चारही दिशेला जगप्रसिद्ध सांची स्तूपासारखे अप्रतिम तोरणद्वार उभारले आहेत. या स्तुपाचा कोनशीला समारंभ २७ जून १९७८ साली जागतिक बौद्ध परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदन्त आलबर्ट एडिरेसिंगे (श्रीलंका) यांच्या हस्ते सकाळी १० वाजता करण्यात आला.
भव्य दिव्य स्तूपाचे उद्घाटन राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी १८ डिसेंबर २००१ रोजी केले.
अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर देशभरातून लाखो अनुयायी येथे मोठ्या श्रद्धेने येतात. नागपूरात या सोहळ्याकरिता बिहार, उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश, कर्नाटक, मद्रास येथूनही लोक येत आहेत. नागपूरातील विविध वस्त्यांमध्ये जवळपास ३५० बौद्ध विहारे आहेत. हे त्यातील सर्वात मोठे आहे. या भव्य दिव्य स्तूपाचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी १८ डिसेंबर २००१ रोजी केले.
#दीक्षाभूमी मराठी माहिती