मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ )

 मागणीपत्र / विनंतीपत्र (पत्रलेखन नमुना कृती - १)

प्रश्न कृती - १.
खालील प्रश्नकृतीमधील जाहिरातीचे वाचन करा. या जाहिरातीवरून मागणीपत्र आणि विनंतीपत्र लिहा.
जाहिरात :
वाचनम् हितकारकम्!
आनंद पुस्तकालय
१०२. विकास नगर, गाळा नं. २, जालना.
दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण - कोणत्याही पुस्तकावर २० % सवलत.
सवलत दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
१) रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
२) शालेय भांडार प्रमूख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागावलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र लिहा.


१. मागणीपत्र
दिनांक २ नोव्हेंबर २०२१
प्रति, श्री. महादेव घोरपडे.
माननीय व्यवस्थापक,
आनंद पुस्तकालय,
१०२, विकास नगर,
गाळा नं. २, जालना.
विषय : पुस्तकांच्या मागणीबाबत.
महोदय,
          सर्वप्रथम, आनंद पुस्तकालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
          मी कुमार अ.ब.क. मला माझ्या जीवनात पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. पुस्तके वाचल्याने ज्ञानामध्ये भरीव आणि दिर्घ भर पडते. शब्दसंपत्ती मध्ये वाढ होते. यामुळे भाषण त्याचबरोबर संभाषण कौशल्यावर प्रभूत्व प्राप्त होते. बोलण्यामध्ये विविध सर्मपक शब्दांचा उत्तम प्रकारे वापर करता येतो. विविध स्पर्धात्मक परीक्षांना समर्थपणे तोंड देता येते. यासाठी   विविध विषयावरील पुस्तके वाचण्यास मला खूप आवडतात. परंतू मला हवी असणारी, माझ्या आवडीची पुस्तके आमच्या येथे मिळत नाहीत. त्यामुळे एक रसिक वाचक या नात्याने आपल्या आनंद पुस्तकालयातून माझ्या आवडीची दहा पुस्तके मागवू इच्छितो. 
          माझ्या आवडीच्या पुस्तकांची यादी या पत्रासोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके आपण लवकरात लवकर आमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. सोबत कृपया या पुस्तकांचे बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम घरपोच सेवा उपलब्ध झाल्यावर त्वरित देता येईल. आपण या सर्व पुस्तकांवर आमच्यासाठी योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे. स्विकारून योग्य सहकार्य करावे.
पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे :
क्रमांक          पुस्तकाचे नाव            लेखक          प्रती
   १.              श्यामची आई           पां. स. साने        ३
   २.              ययाती                    वि. स. खांडेकर   १
   ३.              देह झाला चंदनाचा   राजेंद्र खेर           ३
   ४.              मराठी व्याकरण.      मो. के. दामले      १
   ५.             सावित्री                    पु. शि. रेगे           २ 
   ६.             नॉट गॉन विथ द विंड विश्वास पाटील    ५
   ७.             गोष्टी रुप आंबेडकर   डॉ. देशपांडे        ३
   ८.             टारझन.                   अशोक व्हटकर    ५
   ९.             हनुमान उपासना       महादेव घोरपडे    ४
कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही नम्र विनंती.
कळावे,
आपला विश्वासू,
अ.ब.क.
पत्ता
बी - ५०१, सत्यम प्राईम,
कात्रपनाका, ठाणे (प.)
मुंबई - ४०००५१    


२) शालेय भांडार प्रमूख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागावलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र लिहा.
२. विनंतीपत्र
दिनांक ३ नोव्हेंबर २०२१
प्रति, श्री. महादेव घोरपडे.
माननीय व्यवस्थापक,
आनंद पुस्तकालय,
१०२, विकास नगर,
गाळा नं. २, जालना.
विषय : अधिक सवलत देण्याविषयी.
महोदय,
          मी य.र.ल. ज्ञानप्रसारक विद्यालय, ठाणे पश्चिम या शाळेचा वस्तुभांडार प्रमुख या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे. दिनांक २ नोव्हेंबर रोजी आमच्या विद्यालायाने आपल्या पुस्तकालयातून सुमारे ५०० वेगवेगळ्या पुस्तकांचा संच खरेदी केला आहे. ही सर्व पुस्तके सर्व विद्यार्थ्यांकरता विद्यालयाच्या वस्तुभांडारामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या सर्व पुस्तकांवरती अधिकची सवलत दिल्यास उरलेल्या रकमेतून विद्यालयाच्या ग्रंथालयासाठीही विविध पुस्तके घेण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे. त्यामुळे, या खरेदीवर आपण विद्यालयीन विद्यार्थांकरता अधिक सवलत द्यावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो.
कृपया, आपण यावरती किती सवलत देऊ शकता याचा विचार करून लवकरात लवकर उत्तर कळवावे ही विनंती. स्विकारून योग्य सहकार्य करावे.
कळावे,
आपला कृपाभिलाषी,
य.र.ल.
विद्यालय वस्तुभांडार प्रमुख
पत्ता
ज्ञानप्रसारक विद्यालय,
ठाकुर नगर,
ठाणे पश्चिम - ४००७०२