विनंती पत्र नमूना कृती / अभिनंदन पत्र नमूना कृती ( उपयोजित लेखन : पत्रलेखन नमूना कृती ४ )
प्रश्न कृती : खालील सूचनाफलक वाचा व त्याखालील कृती सोडवा.
योगसाधना
आयोजित
उन्हाळी प्रशिक्षण शिबीर
खास शालेय विद्यार्थ्यांकरीता...!
निःशुल्क योगासन प्रशिक्षण वर्ग
कालावधी ३० एप्रिल ते १५ मे
नावनोंदणी प्रारंभ दि. २५ एप्रिल पासून
संपर्क : सौ. वैशाली घोरपडे ( शिबीर संयोजक, प्रशिक्षक )
१०३, सत्यम गृहसदन, गणेश घाट, फलटण, जि. सातारा.
प्रथम नावनोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य
टीप : प्रशिक्षण वर्गाच्या शेवटच्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुकसोहळा आयोजित करण्यात येईल.
प्रश्न कृती १ : विद्यार्थी या नात्याने या शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत संबंधित व्यक्तीला विनंती पत्र लिहा.
प्रश्न कृती २ : तुमच्या मित्राने विशेष प्रावीण्यासह प्रशिक्षणवर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचा कौतुकसोहळ्यात, गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव झाल्याबद्दल अभिनंदनपर पत्र लिहा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न कृती १ : विद्यार्थी या नात्याने या शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत संबंधित व्यक्तीला विनंती पत्र लिहा.
उत्तर : १. विनंती पत्र
दिनांक २८ एप्रिल २०२१
प्रति,
माननीय सौ. वैशाली घोरपडे
शिबीर संयोजक, प्रशिक्षक
१०३, सत्यम गृहसदन,
गणेश घाट, फलटण,
जि. सातारा.
विषय : योगासन प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळवण्याबाबत.
महोदया,
मी अ.ब.क. ज्ञानप्रबोधनी विद्यालयाची विद्यार्थिनी. 'योगसाधना' या संस्थेमार्फत आयोजित आपल्या योगासन प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी मी इच्छुक आहे. खास शालेय विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आलेल्या या नि:शुल्क योगासन प्रशिक्षण वर्गाला इतर शाळांतील विद्यार्थ्यांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे नावनोंदणी करून सुद्धा माझा प्रवेश निश्चित झाला नाही. कारण विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे मला या वर्गात बसण्याची संधी मिळेल की नाही याची शंका आहे.
मी या प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहे. एक होतकरू व प्रामाणिक विद्यार्थी या नात्याने आपण मला या प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळवून द्यावा ही नम्र विनंती.
प्रस्तुत विनंतीला मान देऊन आपण मला आपल्या शिबिरात सहभागी करून घ्याल याबद्दल विश्वास वाटतो.
आणली विश्वासू,
अ.ब.क.
गणेश सदन,
गणेश घाट, फलटण,
जि. सातारा.
प्रश्न कृती २ : तुमच्या मित्राने विशेष प्रावीण्यासह प्रशिक्षणवर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचा कौतुकसोहळ्यात, गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव झाल्याबद्दल अभिनंदनपर पत्र लिहा.
उत्तर : २. अभिनंदन पत्र
दिनांक १६ मे २०२१
प्रिय अक्षरा,
सप्रेम नमस्कार.
'योगसाधना' आयोजित योगासन प्रशिक्षण शिबिरात जी योगासने तू मन लावून पूर्ण केलीत. योगासनांचा अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह पूर्ण केल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन!
अगदी पहिल्या दिवसापासून या प्रशिक्षण वर्गात शिकवली जाणारी एक एक योगासने तू खूप मन लावून शिकत होतीस. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षक सौ. वैशाली घोरपडे यांनी दिलेल्या या सर्व व्याख्यानांच्या नोंदी अगदी काळजीपूर्वक तू टिपून ठेवत होतीस. योगासना मधील आपल्या चुका सुधारून योग्य त्या नव्या सुधारणा करत तू एका शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास आत्मसात केलास, त्याचेच हे उत्कृष्ट फळ तुला मिळाले.
मला खात्री होती की, कोणतीही गोष्ट मनापासून आत्मसात करणाऱ्या, आपल्याला येणारे सर्व काही इतरांना मुक्तपणे शिकवणाऱ्या, प्रत्येकाला मदत करणाऱ्या आमच्या कष्टाळू अक्षरालाच विशेष प्रावीण्याचे प्रशस्तीपत्रक मिळणार! आणि ते तू स्वकष्टाने मिळवलेस. खूप खूप कौतुक वाटलं तुझं! शिबिराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या कौतुकसोहळ्यात तुला मिळालेला सन्मान किती सार्थ होता त्याचा अनुभव तुझे समारोपावेळचे योगासनांचे सादरीकरण पाहताना आला.
खर सांगू? प्रशिक्षणवर्गात सहभागी झाल्यामुळे माझे ज्ञान तर वाढलेच. शरीराला योग्य अशा चांगल्या सवयी लागल्या आहेत. प्रशिक्षणापासून दिवसभर ताजेतवाने वाटते. कोणतेही काम मन लावून पूर्ण होते. मन कस प्रसन्न राहत. शरीराच्या व्याधी तर कोठे पळून गेल्या आहेत तेच समजत नाही. प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून मी सुध्दा घरातील सर्व मंडळींना योगासने शिकवण्यास सुरूवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुझ्यासारखी गुणी मैत्रिण मिळाली. खूप अभिमान वाटतो मला तुझा! पुनश्च अभिनंदन!
स्वतःची काळजी घे. पुन्हा कधीतरी भेटू. तुम्हा सर्वांची खुशाली कळव. काका-काकूंना नमस्कार सांग. तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत आहे.
तुझी सखी,
अ.ब.क.
गणेश सदन,
गणेश घाट, फलटण,
जि. सातारा.