अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३

 अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती 


 प्रश्न : खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.


 उत्तर :  ०१. अभिनंदन पत्र

दिनांक : ८ एप्रिल २०२१

प्रिय दुर्गेश,

अनेक शुभाशीर्वाद.

          दुगू, साहित्यसंपदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुझी 'समर्पण' कविता वाचली नि डोळयांत आनंदाश्रू तरळ्ले. 'साहित्यसंपदा' सारख्या प्रसिद्ध दिवाळी अंकात तुझी पाहिलीवहिली कविता प्रकाशित व्हावी, तीही एवढया लहान वयात! माझ्यासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. मला तुझे नाव वाचूनच खूप अभिमान वाटला. माझ्या लहान भावाची कविता 'साहित्यसंपदामध्ये' प्रसिद्ध झालेली आहे. हे कोणाला सांगू नि कोणाला सांगू नको अस झाल होत. खरचं तुझे मन:पूर्वक अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

          मी आनंदातिशयाने माझ्या एम. ए. मराठी विषयाच्या सहाध्यायींना, इतर सवंगड्यांना, शिक्षकांना, अगदी वसतिगृहाच्या शिपाई काका- काकूंनाही हा अंक दाखवत सुटलो होतो आणि अनिमिष नेत्रांनी कित्येकदा तुझी कविता पाहत राहिलो होतो. जे कोणी मला भेटतील  त्यांना ती वाचून दाखवत होतो. किती अभिमान वाटला मला तुझा, तो शब्दांत सांगता येणार नाही...

          'समर्पण' या नावातच काय सुंदर कल्पना दडली आहे! कवितेत ही भावना आपले गूढ कायम ठेवून अगदी अलवारपणे उलगडत जाते. शब्दांची तू केलेली अचूक निवड आणि अर्थगर्भ शब्दरचना यांमुळे कविता अधिक खुलली आहे. ती अधिक अर्थपूर्ण झाली आहे. ही शब्दकळा इतक्या लहान वयात कशी साध्य केलीस? अवांतर वाचनाचा, गजल गायन कार्यक्रमांचा, मैफिलींचा रसिकतेने घेतलेला आस्वाद तुझ्या कवितेतील शब्दाशब्दात प्रतीत होतो. तुझं खूप कौतुक वाटतं आणि आश्चर्यही!

          यापुढेही तुझ्याकडून अशाच वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या पण चिंतनगर्भ लेखनाची अपेक्षा आहे. भविष्यात तू नक्कीच खूप मोठा लेखक होशील! दिसामाजि काहीतरी लिहीत राहा. परमेश्वर तुझ्या सृजनशक्तीला, प्रतिभेला अधिक चमक देवो, तुझ्या प्रयत्नांना यश येवो हीच सदिच्छा!

          पत्र पुरे करतानाही डोळे आनंदाने भरले आहेत. येत्या उन्हाळी सुट्टीत घरी येईन, तेव्हा तुझ्यासाठी गंमत आणणार आहे. आई-बाबा व चिनू कसे आहेत?

          आई - बाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग.

          कळावे.

तुझाच दादा,

कु. तन्मय दत्तात्रय घोरपडे.

शारदाश्रम वसतिगृह,

परिमल पेठ,

पाषाण मारूती मंदिर बाजूला,

पुणे - ४११०२२



उत्तर : ०२. अभिनंदन पत्र

दिनांक : ९ एप्रिल २०२१

प्रति, सौ. वैशाली कदम.

माननीय संपादक,

साहित्यसंपदा,

समर्थ नगर, पुणे.

विषय : 'साहित्यसंपदा' च्या वाचनीय दिवाळी अंकाबाबत.

महोदया,

सस्नेह नमस्कार,

          आपण प्रसिद्ध केलेल्या यावर्षीच्या साहित्यसंपदा दिवाळी अंकात अनेक नवनव्या, कल्पक, नाविन्यपूर्ण, अर्थपूर्ण सदरांचा समावेश केल्यामुळे, तसेच लहान मुलांच्या प्रतिभेला वाव देण्याचा प्रयत्न केल्याने हा अंक माहितीपर ज्ञानासह मनोरंजक, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा व उत्तम वाचनीय ठरला त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन!

          आपल्या अंकाचे मला एक रसिक वाचक म्हणून भावलेले वैशिष्टय म्हणजे यावर्षी शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख, कविता, कथा, ललितसाहित्याचा सुंदर मेळ, लहान मुलांची विविध चित्रे, त्यांचे छोटे छोटे जोक्स, बडबड गीते, अभिनयपर गाणी, असे खूप काही! हा अतिशय स्तुत्य उपक्रम तुम्ही तुमच्या अंकामधून राबवलात! यामुळे नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळते आणि वाचन संस्कृतीही वाढते. अंकामध्ये प्रसिद्ध झालेल  सर्व लेख, कविता, जोक्स यांचे वाचन केले आणि आताचे विद्यार्थी फारच हुशार व जागरूक आहेत, हे त्यांच्या लिखाणातून समजले. असे नवनवीन उपक्रम पुढील वर्षीही राबवलेत तर नक्कीच दिवाळी अंकाच्या माध्यमातून एखादा द्रष्टा लेखक किंवा लेखिका घडेल याची खात्री वाटते.

          याशिवाय आरोग्यविषयक महत्वाची माहितीपर सदरे, छोट्यांच्या रुचकर, लज्जतदार पाककृती, गंमत शब्दांची, विविध लहान - थोरांना उपयुक्त असणाऱ्या कथांच्या प्रदेशात अशी नावीन्यपूर्ण सदरे वाचताना खूप मज्जा आली.

          उत्तरोत्तर असेच नवनवीन उपक्रम आपण या अंकाच्या माध्यमातून राबवावेत आणि आपला चाहता वाचक वर्ग वृद्धिंगत करत राहावा, हीच सदिच्छा!

पुनश्च अभिनंदन.

कळावे,

आपला हितचिंतक 

कु. तन्मय घोरपडे

पत्ता

शारदाश्रम वसतिगृह,

परिमल पेठ,

पाषाण मारूती मंदिर बाजूला,

पुणे - ४११०२२