मराठवाड्यातील दिवाळी (बाई सण दिवाळीचा....)

 मराठवाड्यातील दिवाळी

बाई  सण दिवाळीचा

सण बाई दिवाळीचा

राजा साऱ्या ग सणांचा

माहेराला भेटवतो

समिंदर आनंदाचा



     'पोळा अन् सण होती गोळा... '  म्हणत सणांना सुरुवात होते. भारतीय संस्कृती एवढे सण कुठेच नसतील. दिवसांच्या माथ्यावर सण-उत्सवांची  तोरण कायम फडफडत असतात. प्रत्येक सणांच खास वैशिष्ट्य आणि खास गाजावाजा.  दिवाळी सण तर सगळ्या सणांचा राजाच.  गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या मराठवाड्यात दिवाळीची चाहूल लागते ती दसऱ्याच्या नवरात्रतच.  कधीकाळी या प्रदेशात मातृसत्ताक कुटुंबपद्धती असल्यामुळे देवीचा महिमा खूप आहे.  त्यामुळे दिवाळीची तयारी खाऱ्या अर्थाने नवरात्र पासूनच सुरु होत असते. 


     दसऱ्याला नवे कपडे घालून सोनू म्हणजेच शमी किंवा आपटयांची पानं वाटून  झालं की दुसरा दिवस उजाडे तोच दिवाळीची चर्चा सुरू होत असे.  घरातली, गल्लीतली वयस्कर माणसं ' दसऱ्यानंतर बरोबर विसाव्या दिवशी दिवाळी'  असं जमेल तिथं बोलत.  त्यामुळे दसरा दिवाळीचं हे वीस दिवसांचा अंतर आम्हा पोरांना नाही पाठवत असे. नवख्या माणसाला पोरांच्या या ' बरोबर वीस दिवसांच्या' ज्ञानाचं कौतुक वाटे. दसऱ्यानंतर बरोबर विसाव्या दिवशी दिवाळी येईल, जी आजही येते. पण त्याआधी वातावरणात होणारा बदल जाणवू लागे.  पावसाळा संपल्यावर हवेत थंडी जाणवायला लागेल. दिवाळीचे दिवस जवळ आल्याची ही खूण होती. थंडी सुरु झाली की विठ्ठल मंदिरात काकडा सुरू होत असे. भल्या पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत अंघोळी उरकून बायका विठ्ठल मंदिरात काकडयाला हजर व्हायच्या.  सुतापासून- कापडांपासून- वळलेले काकडे तुपात भिजवले की लक्क पेटायचे.  अंधाऱ्या पहाटे लक्क पेटलेले हे काकडे हाती घेऊन बायकांचा गळा गाता होईल -


हरीला लावा तुम्ही गंध

केशर कस्तुरी सुगंध

प्रभूला लावा तुम्ही गंध

यशोदा मानिती आनंद


     कोडकौतुकानं हरीगुण पुन्हा पुन्हा आळवले जाई. या काकड आरतीला आयान सोबत हट्ट करून विठ्ठल मंदिरात येणाऱ्या पोरांची एक टीम तयार होई. मंदिरात आल्यावर थंडीमुळे काही वेळ आम्ही पोरं आपापल्या आयांना चिकटून बसत असू.  पण थोड्यावेळाने ऊब आल्यावर आम्हा पोरांचा स्वतंत्र धिंगाणा सुरू असे.


     दिवाळीच्या निमित्तानं गावात सगळीकडे रंगरंगोटी सुरू होईल. मोठ मोठे गावातील वाड्यांत तर आठ आठ दिवस रंगरंगोटी कामे चाले.  लाकडी माळवदाला तेलपाणी, भिंतींना चुना आणि चिरेबंदी भागाला चक्क ' वार्निस'  लावलं जात असे. हा वार्निस लावण्याचा कार्यक्रम बघत मौज वाटे.  भोवताली त्याच्या वासाचा घमघमाट असे. दारावर ' शुभ- लाभ' लिहून मुख्य दरवाजावर कुलदैवते ची प्रसन्न नाममुद्रा उमटवून रंगरंगोटी थांबवत असे. सर्वसाधारण घरातील रंगरंगोटी मात्र स्वयंसिद्ध असे.  घरातील मोठी माणसं  कळत्या पोरांना मदतीला घेऊन आधी सर्व घर पांढऱ्या मातीने  सारवून काढीत. नंतर खडीचा चुना भिजवला जाई. हा कडक जुना लावण्याची पोरांना परवानगी नव्हती. कारण या अस्सल गावरान चुन्यामुळे  बोटाची कातडी सोलली जायची.   त्यासाठी खबरदारी म्हणून हाताला आधी तेल लावत. चुना लावल्यावर भिंती स्फटिका सारख्या चमकत असत.  भिंतीवर गेरूच्या रंगात, कापूस आलेल्या काडीने पान फुलांची वेलबुट्टी, शुभ लाभ,  कुलदेवता प्रसन्न  आणि तुळशी वृंदावनावर राधा दामोदर अशी चित्रकला झळकायची..


     आकाश कंदील प्रकरणही मजेशीर आणि वेळखाऊ होतं. बुरुडाकडे जाऊन वेताळाच्या म्हणजेच बांबूच्या काड्या आणायच्या. कटलरी दुकानातून लाल निळ्या, हिरव पिवळ मेणकापड आणायचं. चिटकवण्यासाठी पिठाची शिजवुन खळ तयार केली जायची. ओसरीवर हा भलामोठा पसारा मांडून काम चालू असे. प्रथम काड्यांपासून चांदणीचा सांगाडा तयार होत असे. त्या सांगाड्यावरस  संगतवार रंगीत मेणकापड चिटकवल जाई. या तयार झालेल्या चांदणीत रोज संध्याकाळी तेलाचा दिवा ठेवला जायचा. कुणाचा आकाश कंदील मोठा हीसुद्धा सर्वांना उत्सुकता असे. शांत दिव्याच्या आकाश कंदीलला खाली लावलेल्या झिरमिळ्या वाऱ्यावर हलत तेव्हा प्रकाश अधिकच जिवंत वाटे. दरम्यान गावातल्या कुंभाराकडून दिवलाणे म्हणजेच मातीचे दिवे आणले जात असत. अंगणात, ओसरीत, भिंतीतल्या कोनाड्यात हे तेलाचे दिवे प्रकाश उधळत असत.


बाई दिवाळीचे दिवे

मोठ्या प्रेमानं ग लावू

अंधाराला हाकलून

उजेडाला वाट दावू


     दरम्यान गावात छोटी-मोठी फटाक्यांची दुकानं थाटलेली असत. मिठाईच्या दुकानात भोवती माशा घोंगावत त्याप्रमाणे फटाक्यांच्या दुकानाभोवती पोर रेंगाळताना दिसतात.  दुकानासमोर उभे राहून कोण कोण किती रुपयांचे फटाके घेतो? अशी माहिती पोरांनी जवळ गोळा व्हायची. मग घरी जाऊन फटाके घेण्यासाठी लकडा लावला जाई. भुणभुण थांबण्यासाठी वडीलधारे एकदाचे फटाके घेऊन द्यायचे. 'सुतळी', 'बिस्किट', 'लक्ष्मी', 'मिरची' असे बॉम्ब,  टिकल्या, फुलबाजा,  सुरसुर्‍या, तुडतुडे, चक्री, रॉकेट, झाड, रेल्वे, साप गोळी, सिट्टी, नळे असे कितीतरी फटाके घरी आणले जात असत. बहिण भावंडात फटाक्यांची वाटणी होत असे. त्यानंतर स्वतःच्या वाटयाला किंवा हिश्‍श्‍याचे फटाके  सांभाळून दुसऱ्याचे 'ढापणे' हा उद्योग सुरू होत असे. त्यामधून मग भांडणं उद्भवत असत. घरभर दरवळणाऱ्या लाडू, चकली, करंज्या, शंकरपाळ्या यांच्या घमघमाटात ही प्रासंगिक भांडणं विरून जात असत.

     सासरहून लेकी मुद्दाम दिवाळीसाठी माहेराला येत.


बाई, रोजच दिवाळी

माझ्या सासरच्या घरी

परी चव देते न्यारी

माहेरची मीठ भाकरी


     लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला दिवाळ सणाच्या नावाखाली जावयाची चंगळ असे. बऱ्याचदा लग्नात शेवंतीच्या वेळी सासऱ्याकडून आहेर घेताना नवरदेव रुसत असे. रुसण्यामागे नवरदेवाची काही विशेष मागणी असे. त्यामध्ये प्रामुख्याने रेडू म्हणजेच रेडिओ, साइकिल, छल्ला म्हणजेच अंगठी अशी मागणी केली जाई. तेव्हा जावयाचा रुसवा काढण्यासाठी त्रस्त सासरा हात जोडून, ' दिवाळ सणाला तुमची मागणी पूर्ण करतो, पण आता आहेर घ्या' अशी विनवणी करत असे. तो राहिलेला हिशेब दिवाळीत चुकता केला जाई.


     आकाश दिवा, फटाके, दिवाळीचा फराळ या पेक्षाही मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. त्यामध्ये रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेला गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळण हे सार कृषीसंस्कृतीतून,  लोकसंस्कृतीतून झिरपलेलं आजही टिकून आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ गाई-म्हशींना ओवाळल जात. गुराखी पोरं बहुतांश मातंग समाजाची मुलं  नदीकाठच्या लव्हाळ्यापासून दिवा ठेवण्यासाठी एक स्टॅन्ड तयार करतात. तो हातात धरण्यासाठी लव्हाळ्याचीच मूठ असते. त्या स्टँडवर मातीचा दिवा ठेवून गोठ्यातल्या गाई-म्हशींना ओवाळल जात. ओवाळताना ही पोरं चालीत म्हणत.


दिन दिन दिवाळी

गायी - म्हशी ओवाळी

गाई - म्हशी कुणाच्या,

लक्षुमणाच्या

लक्षुमण कुणाचा,

आई - बापाचा

आई - बाप कुणाचे

लक्षुमणाचे

दे माय खोबऱ्याची वाटी

वाघाच्या पाठीत घालीन काठी.


     अशाप्रकारे ओवाळून गुराढोरांना आयुष्य मागणारी ही प्रथा कृषी संस्कृतीतल्या सहजीवनाचं उत्तम उदाहरण आहे. खेड्यात अशाप्रकारे गाई-म्हशींना आजही ओवाळतात. शहरात आत्ता गाई-म्हशी नाहीत पण गुराख्याचं 'दिन दिन दिवाळी' हे गाणं आजही डोक्यात पक्कं बसलेलं आहे.


     दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. गाय गोऱ्याची बारस. या दिवशी दारासमोरच्या अंगणात शेणाच गोकुळ तयार केला जातो. काही भागात याला पांडवांचा वाडा असं म्हणतात. गोकुळात कृष्ण, पेंद्या, गोप- गोपिका, पांडव असतात. या गोकुळा ची पूजा केली जाते. काही विभागात खास गाणी म्हटली जातात. वसुबारसेच्या या गाय गोऱ्याच्या पुजेमागेही एक लोक कथा आहे. कधीकाळी सासू-सून नवख्या सुनेला गव्हाळी - मुगाळीची भाजी करायला सांगितली. सूनेन गोठ्यातली वासरू कापून भाजी केली. 'गव्हाळी मुगाळी'  शब्दांचा गोंधळ झाला. या प्रमादाचं प्रायचित्त म्हणून गाय वासराची पूजा केली जाते. या दिवशी महिला उपवास करतात.


     पोळ्याच्या निमित्ताने बैलाची पूजा होते. गायीच तर नेहमीच पूजन होतं. पण म्हशी बद्दल मात्र फार सकारात्मक मानस दिसत नाही. 'म्हसाड', 'डोबाड' अशा नकारात्मक शब्दांनीच म्हशीचा उल्लेख केला जातो. कडक गोल्डन चहासाठी म्हशीचं दूध लागतो. पण  गाय बैलासारखं म्हशीला भावनिक पातळीवर स्थान मिळत नाही. हा अनुशेष दिवाळीच्या निमित्तानं भरून काढला जातो. पाडव्याच्या दिवशी म्हशींना सजवून त्यांच पूजन केला जातो. त्यांच्या शिंगांना मोरपीस बांधली जातात. हलग्या वाजवत गावातून मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी सजवलेल्या म्हशींना पळवण्याची प्रथा आहे. एरवी जड बुद्धीचा सुस्त प्राणी म्हणून ख्याती असलेली म्हैस मालकांच्या आज्ञांना प्रतिसाद देताना पाहून आश्चर्य वाटायचं. बरोबर आपल्याच मालकामागे पळणारी म्हैस आज्ञेनुसार थांबायची, चालू लागायची, आरोळी देताच मागे फिरायचे. ही कवायत आणि म्हशींना पळवणं बघायला गाव गोळा होत असे. कृषी संस्कृतीशी संवादी असणारी हि प्रथा मराठवाड्यात जवळपास सगळ्या भागात आढळते.


     दिवाळीच्या निमित्तानं पहाटेच्या आंघोळीला फार महत्व आहे. पूर्वी तर अंगाला लावायचं सुगंधी उठणे, शिकेकाई रिठा पावडर असं सारं घरी तयार केला जात असे. हे दिवाळीचा स्नान घालण्यासाठी सासुरवाशीण लेक खास माहेराला येत असे. बहीण भावाला, बायको नवर्याला आणि लेक बापाला अंधाऱ्या पहाटे, थंडीत स्नान घालत असे. या अंघोळीचा मोठा थाट असे. दिवाळीच्या रूढी परंपरा, तत्कालीन लोक जीवनाचा भाग होत्या. लोकगीतातून लोकजीवन जागर होत असे. उस्मानाबादच्या कवियत्री स्नेहलता झरकर यांच्या संग्रही अशा अनेक जात्यावरच्या ओव्या आहेत. त्या दिवाळीच्या अंघोळी संदर्भातील एक मजेशीर उभी आहे. घरातल्या स्त्रीने पुरुषाला दिवाळी ची अंघोळ घालण्याचा मान असतो. पण एका पुरुषाच्या नशिबी ही मानाची अंघोळ नसते. ऐन दिवाळीत बिचार्‍याला ओढ्यावर स्नान करावं लागतं. कारण त्याला दोन बायका असतात. स्नान घालण्याच्या माना वरून दोन बायकांत भांडणं होतं. शेवटी हा नवरोबा घोड्यावर जाऊन आंघोळ करतो. ही लोक कथा ओवीतून उजागर होते.


दोन बायकांची हौस

लई व्हती या गड्याला

दिवाळीच्या दिवशी

आंगूळ करितो वढ्याला


     मराठवाड्याच्या सर्व भागात आढळणारी प्रथा म्हणजे रेड्याच्या टकरी. पाडव्याच्या किंवा भाऊबीजेच्या दिवशी या टकरी होतात. टकरीच्या आयोजनात समाजाचा पुढाकार असे. आता या टकरी कमी होत चालल्या आहेत. पण पूर्वी गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत सगळा गाव जमायचा. वाजत गाजत रेडे म्हणजेच हलगट येऊन दाखल व्हायचे. गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त असायचा. गडबड करणाऱ्यांना पोलीस दंड लावायचे. क्रिकेट मैदानापेक्षा ही मोठी गायरान जमीन.  त्यामध्ये लोक गोलाकार उभे राहायचे. डफडे, हलग्या, पुंगाण्या 'डडंग डांग चिक...डडंग डांग चिक...' असा वातावरणात जोश आणायच्या. वर्षभर खुराक देऊन, मेहनत घेऊन तयार केलेले, तुक तुकीत काळ्या रंगाचे मस्तवाल रेडे फुरफुरायचे. त्यांना आवरण्यासाठी त्यांच्या भोवताली चार पाच पैलवान माणसं हातात काठ्या घेऊन तयारच असायची. पोलीस पाटील, गावातील धुरीण लफ्फेदार फेटे बांधून आत मैदानात आयोजकांच्या भूमिकेत फिरत. पताका लावलेल्या खांबावरच्या  भोंग्यातून सूचना दिल्या जायच्या. मध्येच धावत वर्णन सुरू होई. रेडे विरुद्ध दिशेने येऊन एकमेकांना भिडायचे. तेवढ्या गोंगाटात शिंगाची चकमक ऐकू यायची. एकमेकांना तोलून धरण्याच्या पोज मधले रेडे उन्हात काळ्या पाषाणातल्या शिल्पा सारखे चमकायचे. हा थरार पाहताना लोक चेकाळलेले असत. पंचक्रोशीतल्या गावचे रेडे, त्याची तयारी, त्यांचा खुराक, अमके पाटील, तमका गवळी, भारलेली जागा अशी कुजबूज कानोकानी सुरू असे. रेडे एकमेकांच्या शिंगांनी रक्तबंबाळ व्हायचे. सिंगांनी चिरलेल्या पाठी, तुकतुकीत काळ्या कातडीवर उमटलेलं लाल रक्त उन्हात चमकायचं. हरलेला रेडा मैदानातून पळत सुटायचा, जिंकलेला त्याच्यामागे. शेजारच्या शेतातल्या उभ्या पिकाची नासाडी व्हायची. बऱ्याचदा बेभान रेडे काबूत यायचे नाहीत. काही माणसं जखमी व्हायची. पळणारे रेडे चहा हृदयाचा ठोका चुकवत. पण लहान मुलांसाठी आणि नागरिकांसाठी लाकडी कपडे लावून मांडवाची सुरक्षित व्यवस्था असे. द तासानंतर शेवटची मानाची टक्कर सुरू व्हायची. हा क्षण उत्सुकतेने ताणलेला असे. यावर्षी मानाचा फेटा आणि चांदीचं कडं कोण जिंकणार? या अंतिम तक्रारीत प्रचंड चुरस असे. टक्कर तर सोडा दोन्ही रेडे नुसते पाहण्यासारखे असत. दोघे एकमेकांना भिडतात तेव्हा ऊर्जेच्या डोळ्यांचा तो टकराव असे. हमखास दोघेही रक्तबंबाळ होत. दोघांच्याही नाका तोंडातून फेस गळत असे. बऱ्याचदा हरलेला रेडा जिवाच्या आकांतानं आपल्या गावाच्या दिशेने पळत सुटे. विजयी रेड्याची वाजत-गाजत मिरवणूक निघे. विजय रेड्याच्या मालकाला इनाम म्हणून मानाचा फेटा आणि चांदीचं कडं सन्मानानं दिला जाई. एका वर्षी तर संतापलेल्या पाटलांनी आपला हरलेला रेडा कापण्यासाठी थेट खाटकालाच विकला. दिवाळीचा फराळ, फटाक्यांची आतषबाजी यापेक्षा या टकरींची चर्चाच अनेक दिवस चालत असे.


     मैफल भैरवी पर्यंत यावी, नाटक भरत वाक्याशी यावं तसं दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! माहेरच्या ओढीने सासरहून आलेल्या लेकी भावांना मायेने ओवाळत. भाऊ ऐपतीप्रमाणे बहिणीला ओवाळणी टाके. त्यामध्ये पैसे, वस्तू यापेक्षाही भाव महत्वाचा होता.

शेवटी दिवाळी म्हणजे काय? तर भल्या पहाटे नहाणीच्या धोंड्यावर कुडकुडत्या अंगातून निघणाऱ्या गरम वाफा, दिव्यांची आरास, सोबत गोड-धोड घेऊन भाऊबीजेसाठी आलेली बहीण, आभाळात उडणारे रॉकेट, सुगंधी उटण्याचा दरवळणारा सुवास, डोक्याला लावलेलं सुगंधी तेल, भल्या पहाटे नरकासुर वधाचं रेडिओवर लागलेलं कीर्तन, फराळाची चंगळ, गोठ्यातल्या गुरांना ओवाळणारे गुराखी, सजवलेल्या म्हशींची मिरवणूक, रेड्यांच्या रोमहर्षक टकरी, अंगणातलं शेणाचं गोकुळ, रंगरंगोटी सजलेलं घर, दारासमोरच्या मनोहारी रांगोळ्या आणि या निमित्तानं एकमेकांना भेटणारी हसमुख माणसं असा एक 'कोलाज' आजही 'सेव्हड्' आहे.


     शेवटी दिवाळीनंतरच्या पौर्णिमेला संध्याकाळी अंगणातल्या तुळशीचा साग्रसंगीत लग्न लागे. दुसऱ्या दिवसापासून बिचार 'वऱ्हाडी' आपापल्या दैनंदिन जगरहाटीला लागत.

बाई सण दिवाळीचा

असा पुना पुना यावा

नास करून अंधाराचा

घरी उजेड असावा.