हमालाची जीवनव्यथा
किंवा
श्रमिकाचे मनोगत
किंवा
मजुराची आत्मकथा
(आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध)
मुद्दे : प्रस्तावना - उतरते दिवस - शहराकडून गावाकडे परतायचे - वयाच्या दहाव्या वर्षी शहरात आलो - हमाली - शाळेत जाण्याचा प्रयत्न - अयशस्वी - हमाली चालू - संघटना - दर नियमित केले - शहरात घर नाही - गावाकडच्या घरी घरातील माणसे - शहरात एकाकी जीवन - कष्टांना योग्य फळ नाही - समाजाकडून अवहेलना....
"मित्रांनो, आता लवकरच माझ्या भाग्यातील येथे असणारा माझ्या वाट्याचा अन्नाचा शेर आता संपणार आहे. मी काही दिवसात माझ्या गावाला जाणार आहे. आम्हा श्रमिकांच्या जीवनात कुठली आली आहे 'पेन्शन'! स्वतःचे हात - पाय थकले की थांबायचे. गेली पन्नास ते साठ वर्ष ही मोलमजुरी चाललीय! आता मी सत्तरी गाठली आहे. आझे उचलले की मान डगडगते, पाय अडखळतात. एकदा दोनदा सामान घेऊन जाताना पडलोही. त्यामुळे लोकांच्या किंमती वस्तूंचे तुटून किंवा फुटून भारी नुकसान नको, म्हणून मी गावाला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे."
"वयाच्या दहाव्या वर्षी गावाकडून शहरात आलो. वाटले, कुठे आधार मिळेल. चार बुके शिकायला मिळतील. एका गावकऱ्याच्या ओळखीने एका शेटजीकडे कामाला राहिलो. शेटजींच्या घरी नोकरी करत असताना मला खायला प्यायला भरपूर मिळाले, पण पुस्तकाला हात लावला की शेटजींना संताप येत असे. म्हणून त्यांच्या कामाला रामराम ठोकला आणि हमाली सुरू केली. रात्रीच्या शाळेत नाव घातले. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले, पण नोकरी मिळाली नाही. त्यामुळे सुरू केलेली हमाली आतापर्यंत सोडली नाही."
"खर सांगायच झाल तर ज्या दिवसापासून मी हमाली करण्यास सुरूवात केली तेव्हा मी ज्या ठिकाणी हमाली करत होतो तेथील हमालवर्ग प्रथमता संघटित नव्हता. त्पामुळे मजुरी मिळवण्यासाठी फार धावपळ करावी लागत असे. अनेकजन अवजड ओझी उचलायला लावत, पण पैसे देताना फार काचकूच करत असत. आता मजुरांची संघटना झाली आहे. त्यामुळे ओझी उचलण्याचे दर ठरले आहेत. एखादा भला माणूस खुश होऊन जास्त मजुरी देत असत."
"एवढे कष्ट करून हमालाच्या वाट्याला काय येते? तर खानावळीतले थंडगार जेवण. फलाटावर झोपणे, फलाटावरच स्नान. रात्री तेथेच भजन करतो. तेवढेच मनाला बरे वाटते. वर्षातून पंधरा दिवस गावात जातो. गावात एक वाडवडिलांचे घर आहे. त्याचीच डागडुजी करून माझी माणसे तेथेच राहतात. मुलाबाळांची लग्ने झाली. मुलगे गावाकडेच काम करतात. आता नातवंडे गावी शिकत आहेत."
"मित्रांनो, दिवसभर घाम गाळून, मर-मर काबाड कष्ट करून सुद्धा आम्हाला त्याचे फळ खरचं मिळते का? कधी कधी ऊन, वारा, पाऊस यामध्ये साधा निवारा सुद्धा मिळत नाही. माझ्या आयुष्यातील घडलेली सर्वात वाईट घटना म्हणजे एका स्टेशनवरील बाजूची इमारत पडली. या दुर्घटनेमध्ये अनेक मजूर चेंगारले गेले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर मनाला एकाच गोष्टीचा खेद वाटतो तो म्हणजे समाजातील इतर कोणाचेही लक्ष या गरीब कामगारांकडे नव्हते. या उलट काही मराठी आणि हिंदी चित्रपटातून हमालवर्गाचे चित्र जे रंगविले आहे, ते फसवे आहे.
"मित्रांनो, आता शेवटची एवढीच इच्छा आहे की, जीवनातील सरते दिवस तरी आरामात जावेत. त्यासाठी मी आता गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावाकडचे दिवस सुखा- समाधानामध्ये जावेत याकरीता दररोज परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो."